तसं बघितलं तर जागतिक महिला दिन काल होता पण कालच्याच दिवशी या विषयावर लिहावं असा काही मी नवस केला नसल्यानं आज ही पोस्ट..
खूप जणांनी काल फोनवर, प्रत्यक्ष भेटून, मेसेजवर महिला दिनाच्या शुभेच्छांचा अगदी वर्षाव केला होता.. त्यातल्या बऱ्याच लोकांना अजूनही थँक्स म्हणता आलं नाहीये..
तर, आपण सगळी मंडळी जी काल प्रत्येक स्त्रीला शुभेच्छा देत होती, त्यातल्या एखाद्या स्त्रीने जर कधी तुमच्याकडे मदत मागितली तर तुमच्यातले किती लोक मदत करतील?
मदत या शब्दाचा अर्थ इथे आर्थिक मदत असा मुळीच नाहीये.. आणि फेबुवर 'ताई तुम्ही ह्यांव करा, त्यांव करा' अशा अर्थाचा तर त्याहूनही नाहीये..
आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या महिला अत्याचाराचे अनेक किस्से मी पाहिलेत.. तेव्हा अगदी महिलेला ग्राह्य धरण्यापासून ते तिला मारहाण करेपर्यंत सगळे प्रकार मला महितीयेत.. यात कुटुंब म्हणून वावरत असताना 'ही' आपल्यासाठी हे करेलच किंवा तिला करावंच लागेल ही मानसिकता अत्यंत नीच.. आणि त्यातही एखाद्याला आपल्या या मानसिकतेचा प्रचंड अनाठायी अभिमान असतो..
इथं त्या महिलेच्या 'का' या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं.. आणि जर उत्तर नाहीये तर नक्कीच ती घडणारी किंवा घडवून आणण्यात आलेली गोष्ट अन्याय आहे, अत्याचार आहे हे स्पष्टय..
घराणं, इज्जत, परंपरा, सन्मान, संस्कृती, ल** लसूण या अशा मोठमोठाल्या शब्दांची पाखडन करून आपण किती चांगले आणि 'ती' कशी नालायक हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.. अशा परिस्थितीत कोण तिच्या बाजूने उभं असतं? तिच्या या अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं किंवा तिला प्रोत्साहन देणं हे माझ्या मदत या शब्दात अपेक्षित आहे..
अगदी चार घरची धुणीभांडी करणारी महिला किंवा लाखोंचं पॅकेज घेणारी एखादी अधिकारीण बाई असेल, प्रत्येक स्त्री यातून जातेच.. एखाद्या बोलणाऱ्या स्त्रीला कसलाही धाक दाखवून शांत करणं किंवा त्याहीपलीकडची ती असली तर वाट्टेल तसं वागवून, प्रसंगी मारून गप्प बसवलं जातं आणि यालाच आपली संस्कृती पुरुषार्थ म्हणते.. (?)
जे पुरुष आपल्या हक्कांचं हनन होऊ नये म्हणून भांडतात तेच पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीच्या हक्कांचा भंग करतात तेव्हा माझ्या मनात त्यांच्या पुरुष असण्यावर शंका उपस्थित होते..
आणि माझं फार पूर्वीपासून एक ठाम मत आहे की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे हक्क काढून घेते.. यात थोडा भाग मानसशास्त्राचाही येतोच.. माझ्या पूर्वायुष्यात जर एखाद्या स्त्रीने मला छळलं असेल तर भविष्यात माझ्या हाताखाली येणाऱ्या स्त्रीलाही मी असंच छळणार अशा प्रकारची एक विकृत मानसिकता आपल्याला बघायला मिळते.. म्हणजे एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनते. एखादी स्त्री जर तोंडावर खरं खोटं करणारी असेल तर तिला फाटक्या तोंडाची म्हणून हिणवताना मी पाहिलंय.. ती जर हुशार असेल तर दीड शहाणी समजतात आणि ती जर तिच्या कामातून बक्कळ पैसा मिळवून चैनीचं आयुष्य जगत असेल तर ही घाणेरडी मंडळी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायलाही मागे हटत नाहीत..
मुळात, वेश्या व्यवसायातून सोडवून आणलेल्या महिलांसाठी मी काम करते तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी कित्ती घाणेरडे दिवस काढलेत हे ऐकून वारंवार अंगावर काटा येतो.. आणि ती महिला गिऱ्हाईककडून जितके पैसे घेते त्यातले तिला किती मिळतात हे फक्त तिलाच माहीत.. त्यामुळं धंदा करून कुठलीही स्त्री चैनीचं आयुष्य जगू शकत नाय हे मी लिहून देऊ शकते..
अशा या समाजात लग्न नावाचा वेगळाच बाजार भरलेला असतो.. लग्न व्हायच्या पूर्वीची महिलांची घुसमट आणि लग्नानंतरची घुसमट यातला फरक काय तर गळ्यात काळ्या धाग्यांची एक माळ पडलेली असते जी तिच्या प्रत्येक कृतीवर कंट्रोल आणते.. लग्नापूर्वी किमान बोलण्याचं असलेलं स्वातंत्र्यही लग्नानंतर हरवतं आणि उरतं ते फक्त फुलांनी वेढलेलं काटेरी कुंपण.!!
माझ्या यादीतले किती पुरुष स्वखुशीने आपल्या घरातल्या महिलांना कामात मदत करतात ठाऊक नाय.. किमान बोटावर मोजण्याइतके तरी मिळावेत बाप्पा!! मला नेहमी वाटत आलंय की कुठलंही काम हे स्त्रीचं किंवा पुरुषाचं नसतंच.. ते माणसाचं असतं.. म्हणजे ज्याला भूक लागते त्याला स्वयंपाक यायलाच हवा.. ज्याला स्वच्छ घर आवडतं त्याला साफसफाई यायलाच हवी.. आणि ज्याला स्वतःला बाबा म्हणवून घ्यायचंय त्याला बच्चूचे डायपर बदलता यायलाच हवेत.. ज्याला जेवायची आणि कपडे घालायची इच्छा आहे त्याने भांडी घासायला आणि कपडे धुवायला लाजू नये आणि हे करायची लाज वाटत असेल तर जेवण करू नये आणि कपडे घालू नयेत..
स्त्रियांना नेहमी समान हक्क हवे असतात आणि पुरुषांना मक्तेदारी हवी असते हे चित्र मी लहानपणापासून बघत आलीये.. आज मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथं माझ्याकडे संपूर्ण एक पिढी घडवायचं सामर्थ्य आहे.. इथं माझ्याइतकाच माझ्या लाईफ पार्टनरचाही घरातला रोल खूप महत्त्वाचा ठरतो.. त्याच्या पुरुषी अहंकारापायी जर त्याने असं सगळं करायला मनाई केली तर संपूर्ण एका पिढीचं कधीही न भरून येणारं नुकसान माझ्या हातून होण्यापेक्षा ती पिढीच जन्माला येऊ न देणं केव्हाही चांगलं असं मला वाटतं..
शेवटी इतकंच की कालच्या पेक्षा जास्त चांगला आजचा दिवस असो आणि आजच्या पेक्षा उद्याचा.. येत्या महिला दिनापर्यंत आयुष्याला अजून एखादं सुरेख वळण मिळालेलं असावं आणि प्रत्येक वेळी स्त्रीला समान संधी द्यायची भाषा करण्यापेक्षा ती सामर्थ्यवान आहे हे मान्य करून चाललो तर कदाचित समाज म्हणून आपण एक पाऊल पुढं गेलेलो असू.!!
आणि ज्यांना पटेल, झेपेल त्यांनीच हे घ्यावं.. बाकीच्यांना बाहेर पडण्याची अनेक दारं नेहमीच उघडी आहेत..
तीच ती हरामखोर,