http://prachisonawane12.blogspot.com/2020/05/blog-post.html (भाग १ ची लिंक)
मग पुढे बाईंनी आईला सांगितलंच.. पण माझी काजळ पावडरची चिंता बघून आई हसायला लागली..😬 आणि त्यानंतर कधीही मी रडत असले तर बाबा आणि आई मला म्हणायचे की अगं रडली तर तुझी पावडर पुसून जाईल.. आणि मी लगेच रडायचं थांबवायची..🙈
तसं ना मला माझ्या बाबाने एक फळा आणि छडी आणली होती.. रोज शाळेतून आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना मी जे शाळेत शिकले ते शिकवायची.. माझे विद्यार्थी कोण? तर घरातली प्रत्येक फरशी म्हणजे माझा विद्यार्थी.. त्यात एक चिंटू (हा माझ्या आजोळी अंबरनाथला आजीच्या घराशेजारी राहणारा माझ्याच वयाचा माझा मित्र) दुसरी बबली (हे माझ्या आईचं माहेरचं नाव) आणि तिसरी बुजी (ही पण आजीच्या बाजूला राहणारी पण माझ्यापेक्षा खूप मोठी मुलगी) हे तिघे माझे आवडते विद्यार्थी होते.. मी सगळे प्रश्न याच तिघांना विचारायची आणि फटके द्यायचे असतील तर दुसऱ्या फरश्यांना (म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना) द्यायची..🙊
मी माझ्या शाळेत जरी मराठीत शिकत असले तरी माझ्या विद्यार्थ्यांना मी हिंदीत शिकवायची.. कारण माझ्या भावाच्या जन्माच्या वेळी जेव्हा मी अंबरनाथला गेले होते तेव्हा पहिल्या दिवशी मला ती हिंदी भाषा समजतच नव्हती.. पण दोन दिवस फक्त दारात उभं राहून मी या हिंदी बोलणाऱ्या पोरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते.. आणि तिसऱ्या दिवशी मी त्यांच्यात खेळायला जाऊन त्यांच्याच हिंदी accent मध्ये बोलत होते.. माझे आजी आजोबा, आई बाबा तर थक्क झाले होते माझी दोन दिवसांत शिकलेली हिंदी बघून.. आणि म्हणूनच माझा प्रयत्न होता की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी यायलाच हवी..😊
मग ही कुंभार गल्लीतली शाळा सोडल्यावर मला समर्थ शाळेत ऍडमिशन मिळालं नाय म्हणून गांधी मैदानातल्या मार्कंडेय शाळेत घातलं.. ती शाळा मंदिरात बांधलेली होती.. आजूबाजूला मंदिरं होती आणि खेळायला मैदान पण होतं.. मी तिथल्या बालवाडीत प्रवेश घेतला तेव्हा बघितलं की माझ्याएव्हढीच टाबरं (म्हणजे पोरं) शाळेत बोंबलत बसायची.. कोणी कोणी तर चड्डीत शी पण करून ठेवायचं..🙄 म्हणजे इतकी मोठी होऊन ही पोरं अशी कशी वागू शकतात हेच मला समजायचं नाय..😵 त्या बालवाडीच्या वर्गात एक सुविचार होता 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'.. पुढचं वाक्य काय मला समजायचं नाय पण फक्त तेल गळतंय एवढं समजायचं.. बालवाडीच्या मानाने ते पुरेसं होतं..😇
मग हे बालवाडीचं वर्ष संपलं आणि आम्ही पहिलीला आलो.. आम्ही म्हणजे मी आणि माझी गल्लीतली मैत्रीण ऐश्वर्या.. आमच्यापैकी कोण मोठं आहे हे आम्हाला माहीत नसल्याने आम्ही दोघी एकमेकींना तायडी म्हणायचो आणि अजूनही म्हणतो.. आम्ही खऱ्या अर्थाने लंगोट यार होतो आणि अजूनही आहोत.. तर आम्ही पहिलीला आलो आणि शाळा साडेसातला भरायला लागली.. माझे वांदे झाले.. कारण मी जन्मापासूनच अत्यंत झोपाळू प्राणी.. कोणी मला एकवेळ रात्रभर जागायला सांगितलं तर मी जागू शकते पण पहाटे सहा वाजता उठणं म्हणजे शरीरातून यमाने प्राण काढून घेण्यासारखं आहे.. मग मी रोज शाळेला उशिरा जायची.. एकतर सकाळी हळूच उठायचं.. मग हळूच ब्रश करायचं, मग सावकाश अंघोळ आणि मग हळूहळू चहामध्ये बिस्किटं बुडवून खायचं.. मग निवांत शाळेचं आवरून शाळेत जायचं.. आणि माझा बाबा मला चिडवायला 'आवराss थिगळेsssss' असं म्हणाला की मला जाम रडायला यायचं..😖 एकदा असाच खूप पाऊस पडला होता आणि मला उशीर पण झाला होता.. शाळेसमोर खूप पाणी आणि चिखल पण साचला होता.. मला उशीर झाला की बाबा कधीच वर्गापर्यंत यायचा नाय.. मग मलाच युद्धावर निघाल्यागत गेटपासून वर्गापर्यंत जावं लागायचं.. आणि त्या दिवशी तर वर्गाच्या दारात पण चिखल आणि पाणी साचलेलं होतं.. मी घाईघाईत आले आणि त्या पाण्यात पाय घसरून पडले..😕😓 च्यामारी आख्खा वर्ग मला हसला होता..!!😡 मला ते embarrassed की काय ते फील झालं होतं..🤕 डोळ्यातलं पाणी पण डोळ्याच्या कडांपर्यंत आलं होतं पण मला रडताना बघून अजून सगळे हसतील म्हणून मी रडणं दाबून ठेवलं होतं.. त्यात मला आधीपासूनच पहिल्या बेंचवर बसायची सवय होती आणि असला लोच्या झाल्यामुळं मला मागे बघायची पण सोय राहिली नव्हती..😏
त्यावेळी मला वर्गशिक्षिका म्हणून श्रीगादी बाई होत्या.. पुढे चौथीपर्यंत त्याच वर्गशिक्षिका मला लाभल्या हे माझंच भाग्य.. मग दुसरीत आल्यावर माझ्या बाईंच्या लक्षात आलं की मी अभ्यास तर करते पण मी भित्री आहे आणि म्हणून सगळ्यांसमोर उत्तरं द्यायला घाबरते.. पण माझी मैत्रीण ऐश्वर्या उत्तर चुकीचं असो वा बरोबर, देऊन मोकळी व्हायची.. मी मात्र वर्गात उभं राहायला पण घाबरायची.. मग बाईंनी एक दिवस माझ्या आईला बोलावलं आणि म्हणाल्या, प्राची अभ्यास तर करते पण खूप घाबरते.. तुमच्या घरात कोणी strict व्यक्ती आहे का ज्याला ती घाबरते? तेव्हा आईने सांगितलं की तिचे बाबा खूप कडक स्वभावाचे आहेत म्हणून असं होतंय कदाचित.. पण आईने बाईंना विनंती केली की तुम्ही माझ्या मुलीचा भित्रेपणा घालवा.. मग बाईंनी मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला.. ते काय असतं मला माहित नव्हतं पण बाई म्हणाल्या की जे तुला दिलंय ते तोंडपाठ करून ये.. बाईंची आज्ञा म्हटल्यावर मी शब्दनशब्द पाठ केला.. आणि त्या शनिवारी शाळेत स्पर्धा होती.. बाई म्हणाल्या, तुझं नाव आल्यावर तू जाऊन पाठ केलेलं तिथं बोलायचं.. अबे तिथं पहिली ते चौथीतले किमान 300 ते 350 पोरं अस्तेन बावा..!!😨 पण आता मी पळून पण जाऊ शकत नव्हते..😰 दोन तीन जणांचं भाषण झाल्यावर माझं नाव घेतलं आणि मी माईकसमोर आले.. समोर एवढे पोरं, मागे सगळ्या शिक्षिका.. आणि डोळ्यासमोर अंधार..😑 शब्दच पळून गेले होते डोक्यातून आणि तोंडातून.. बाई मला खालून म्हणत होत्या 'प्राची बोल, प्राची बोल..' आणि मला पहिली ओळच आठवेना.. पण नंतर अर्ध्या मिनिटाने मला पहिली ओळ आठवली 'अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो..'😍 आली भो आपली गाडी रुळावर..! मग जे धडाधड शब्द फेकले.. पण सगळे ढगात बघूनच..😆 कारण खाली कोणाकडे बघायची आपली हिंमत नव्हती.. एकदाचं भाषण संपलं.. मी खाली उरतले आणि माझ्या बाई एवढ्या खुश झाल्या की काय सांगू.. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं..!!🤗 त्यांनी मला पोटाशी घेतलं आणि शाबासकी दिली.. कसली भारी फिलिंग होती यार ती.. !!😘
नंतर बाईंनी मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि बाईंची ती शाबासकी मिळवण्यासाठी मी पण प्रत्येक स्पर्धेत भाग घेत गेले.. मला जिंकणं महत्त्वाचं नव्हतं.. बाईंनी माझं केलेलं कौतुक मला हवंहवंसं वाटत होतं.. त्यामुळं 'टिचर के लिये कुछ भी' हे आपण ठरवून टाकलं होतं..😉
त्यानंतर..
.
.
.
.
.
.
प्राchi..💞
13/05/2020