Friday, 29 November 2019

पुन्हा 'ती'च..



कितीदा तुम्ही न्यूज बनवणार आणि कितीदा मोर्चे काढणार..??
मुलींना अंगभर कपडे घालायला शिकवणार..?
नजर खाली घालून चालायला शिकवणार आणि,
सहन करायला शिकवणार..??
कधी आपल्या मुलांना शिकवलंय का कि रस्त्याने चालणारी मुलगी तुमच्या बापाची प्रॉपर्टी नसते..
ती कोणाची तरी बहीण, मुलगी, आई, बायको आणि प्रेयसीही असते..
कोणाच्यातरी घरातली जबाबदार व्यक्ती असते..
आणि शरीराची भावना इतकी विक्राळ व्हावी कि त्या भावनेला कुठलीच मर्यादा राहू नये,
इतकंच नव्हे तर जिवंतपणी जाळून टाकावं..??
म्हणजे जेव्हा केव्हा अशी घटना घडते तेव्हा प्रचंड संताप होतो..
सगळ्यांचाच..
मी म्हणत नाहीये कि पुरुषसत्ताक समाज पुरुषांनीच बनवलाय असं..
यात सहन करणारी प्रत्येक स्त्रीही तेवढीच गुन्हेगार आहे..
आणि त्याहूनही, त्या महिला गुन्हेगार आहेत ज्या अशा पुरुषी परंपरांना साथ देतात आणि सबलीकरण करतात..
जेव्हा कोणी एखादा गुन्हा करतो तेव्हा 'त्याच्या' गुन्ह्याबाबत न बोलता 'तिच्या' कपड्यांबाबत, वयाबाबत, वेळ-काळाबाबत
आणि तिच्या सवयींबाबत बोललं जातं.. का..??
कधी ऐकलंय का कि कुणी मुलगा बनियन आणि शॉर्ट्सवर फिरतोय म्हणून मुलींच्या कुठल्याही टोळीने त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं??
आपल्या घरातही बाबा आणि भाऊ घरात उघडे फिरत असतात, पण कधी मुलींची नजर फिरलीये का..??
मग मुलांच्याच भावना का चाळवतात..??
ती ना, छोटेच कपडे घालायची.. ती तर ओठ लाल करून आणि मेकअपच करून फिरायची.. आणि हि तर काय, मुलांसोबत फिरायची..
म्हणून ह्यांच्यासोबत असं झालं..
अरे मग ज्या डायपरमध्ये होत्या त्यांनी काय केलं होतं..?? आणि त्या पाय लटपटत चालणाऱ्या आजीने कसलं प्रदर्शन केलं होतं रे..??
मला त्या प्रत्येक व्यक्तीविषयी संताप आहे जी व्यक्ती मुलींचे मापदंड ठरवते..
दोष जर मुलींमध्ये असता तर मुली बलात्कार करत फिरल्या असत्या..
पण इथं प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून बघण्याचा..
ज्याचा कोणीही विचार करत नाय..
मुळात प्रेम काय आहे हे ज्याला समजतं ती व्यक्ती कधीच या टोकापर्यंत येत नसते..
आणि जी व्यक्ती येते त्या व्यक्तीला ती भावना समजलेलीच नसते..
हे सगळं लिहिताना आणि विचार करताना माझा कितीदा संतापाने डोळ्यात पाणी आलंय..
माहित नाय..
काल 'ती' होती..
आजही 'कोणी' असेल..
उद्या 'मी'ही असू शकेल..
पण मला भीती नाहीए.. जितक्या आत्मविश्वासाने मी काल रस्त्याने जात होते तितक्याच ताकदीने मी आजही चालत राहीन आणि माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक मुलीला ही हिंमत देण्याचा प्रयत्न करीन..
आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत असल्या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांवर थुंकत राहीन..
लिहीत राहीन आणि यांच्या नसलेल्या इज्जतीचे ताशेरे उडवून अघोरी आनंद घेत राहीन..
कधी माझ्यावर जर असा प्रसंग ओढावलाच तर शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, मी लढतच राहीन..
तुम्हीही बघा, विचार करा, ठरवा..
आणि प्लिज, नेहमीप्रमाणे फक्त विचार करू नका ना..
कमीत कमी आपल्या आसपास असलेल्या मुलाशी किंवा पुरुषाशी याबाबत बोला..
explain करा..
समजावून सांगा..
ही फक्त पोलिसांची किंवा समाजसेवकांची किंवा शासनाची जबाबदारी नाहीये..
कुठल्या ना कुठल्या मुलीशी कुठला ना कुठला संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ही नैतिक जबाबदारी आहे..
व्यक्त होत राहा.. मन मोकळं करत राहा..
हा आपलाच समाज आहे आणि इथं आपल्यालाच राहायचंय..
मग सुरक्षित आणि सेफ राहुयात ना..
.
.
.
.
प्राchi.. 💞

Monday, 25 November 2019

गोष्ट तरुणाईची..


भारत हा युवकांचा देश आहे असे जगभरात समजले जाते.. यात तथ्यही आहेच.. ढोबळमानाने १५ ते ३५ वर्ष वयोगटातील स्त्री पुरुषांना आपण युवा म्हणू शकतो.. आणि भारतातली दर तिसरी व्यक्ती हि युवा आहे..येत्या २ वर्षांत म्हणजेच पुढील जनगणनेदरम्यान भारतातील युवकांची संख्या ६०० दशलक्षांपर्यंत पोचलेली असेल.. आणि भारत हा जगातला सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल.. यातील ६४ % लोकसंख्या हि कमावती असेल..
आता बघायला गेलं तर उत्पन्न मिळवायला लागणारी औपचारिक कौशल्ये केरळ राज्यातील युवकांकडे आणि त्यामागोमाग महाराष्ट्र, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील युवकांकडे आहेत.. पण याविरुद्ध या युवकांना रोजगाराच्या किती संधी मिळतात हे आपल्याला माहित आहेच.. भारत हा विकसनशील देश असल्याने इथे सुधारणा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि यातून युवकांना मोठा रोजगार मिळू शकतो.. परंतु वाढलेल्या शिक्षणाच्या किमती, शिक्षणाबद्दल अनास्था, वयाच्या १८ व्या वर्षांनंतरही आईवडिलांनी शिक्षणासाठी मदत करावी हा अट्टाहास आणि यातून राहणारं अर्धवट शिक्षण, समवयीन मित्र मैत्रिणींची वाईट संगत,मोफत आणि स्वस्त नेट आणि त्यामुळे वाढलेला इंटरनेटचा अतिवापर, व्यसनाधीनता, राजकारणाकडे जाणूनबुजून केलेलं दुर्लक्ष, अयोग्य आहार आणि यातूनच अनेमियासारख्या आजारांमधून येणारा अशक्तपणा आणि उदासीनता, लैंगिकतेबद्दल मिळवलेली अपूर्ण माहिती आणि त्यातून उद्भवलेले जीवघेणे आजार, आणि बरंच काही.. हि यादी खूप मोठी आहे आणि याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत.. जितकी भारताची लोकसंख्या आहे त्याहीपेक्षा जास्त समस्या या देशात आहेत.. पण म्हणून प्रत्येक वेळी दुसऱ्या कोणाकडे बोट दाखवून आपण आपल्या अकार्यक्षमतेला झाकू शकत नाहीत.. या सर्वांचं उत्तर आपल्याकडेच आहे.. यातला कुठलाही असा प्रश्न नाही जो आपण सोडवू शकत नाहीत..
यातल्या बऱ्याच मोठ्या युवकवर्गाला आपले अधिकार काय आहेत याचीही जाणीव नाही असंही बऱ्याचदा दिसून येतं.. आपण संयुक्त राष्ट्रांचा बालहक्क जाहीरनामा ११ डिसेंबर १९९२ रोजी स्वीकारला आणि बालकांच्या हक्कांप्रती जागरूक राहण्यासाठी आपल्या देशाने स्वाक्षरी केली. परंतु आजही फक्त महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी राजस्थान आणि बिहार नंतर महाराष्ट्र बालविवाहामध्ये अग्रेसर आहे आणि हे युनिसेफच्या अभ्यासातून निदर्शनास आलंय.. अजूनही आपले आई बाबा आपल्या मुलींना 'लोकं काय म्हणतील' या भीतीने घराबाहेर शिक्षणासाठी पाठवत नाहीत आणि मुलगी पळून जाऊ नये म्हणून बालपणी विवाह लावून देतात.. आमच्याकडे बालकामगार काम करत नाहीत असं आपण खूप वेळा पाहतो पण ते चहाच्या टपरीवर काम करणारं छोटू त्याच्या घरातला कमावता पुरुष असतो.. ही भारतातली सत्य परिस्थिती आहे!! आजही आपल्या देशात मुली घरातही सुरक्षित नाहीयेत, मुलींवर होणारे बलात्कार हे ९५% ओळखीच्या लोकांकडून होतात मग बाहेरचा तर प्रश्नच सोडा.. मुलींनी कशे कपडे घालायला हवेत हे आजही इथले बाबा बुवा ठरवतात आणि त्यांच्या या वाक्यांवर लाफ्टर पडतात.. इथं वर्णभेदही होतो आणि बायका म्हणजे पायातल्या चपला म्हणून संबोधल्या जातात.. किळसवाणं आहे किनई हे??  
भारत कसा असायला हवा हे कुण्या बाबाने सांगायची गरजच पडू नये इतकं आजच्या युवकाने सक्षम असायला हवं.. यासाठी गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलण्याची आणि स्वतः पासून बदल घडवण्याची.. यासाठी पुन्हा आपल्याला वेगळी डिग्री घेण्याची मुळीच गरज नाहीये.. गरज आहे ती फक्त माणसाला माणूस म्हणून बघण्याची.. मित्रांनो, आपल्या देशात बदल घडवायला देव अवतरणार नाहीये.. हि जबाबदारी आपलीच आहे आणि सुरुवातही आपल्यालाच करायचीय.. आपल्याला किमान कायदेव्यवस्था माहित असायला हवी, एखादी चुकीची गोष्ट आसपास घडत असताना एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार करता यायला हवा.. कुठल्या समस्यांसाठी कुणाकडे तक्रार करायची किमान एवढं तरी माहित असावं.. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवता यायला हवा आणि नाहीच काही जमलं तर कमीत कमी समोरच्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर तरी ठेवता यावा..
आपण युवक म्हणून आपल्या देशाकडून जर आपल्याला काही अपेक्षा असतील तर त्याआधी समजून घ्या कि तुमच्यासाठी इथं लोकांनी जीव गमावलेत आणि आणि तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य उपभोगायला मिळतंय.. आज देशाची राजकीय परिस्थिती पाहता देशाला सक्षम आणि हुशार नेतृत्त्वाची गरज आहे आणि अशी गरज पूर्ण करू शकणारं एकही जबाबदार नेतृत्व भारताला मिळू नये म्हणजे केवढी ही उपेक्षा भारताची!! इथल्या युवकाला आज योग्य अशा नेत्याची गरज आहे जो भारताला विकसित राष्ट्र म्हणून नवी ओळख देईल.. हे जेव्हा होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आपण आपल्यात बदल घडवायला हवेत.. आपण युवक हि आपल्या देशाची खरी ताकद आहोत हे जरी आपण विसरलो असलो तरी किमान आता तरी जागे होऊ या.. समाजकारण आणि राजकारण समजून घेतल्याशिवाय आपल्याकडे प्रगतीचा दुसरा पर्याय नाही आणि देशात प्रत्येक मुलगा मुलगी जेव्हा एकमेकांना समान समजून हि मोहीम हाती घेतील तेव्हा आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये हे वेगळं सांगायची गरज नाहीये..

प्राchi.. 💞