Wednesday, 13 May 2020

रम्य ती शाळा.. (भाग २)

http://prachisonawane12.blogspot.com/2020/05/blog-post.html (भाग १ ची लिंक)


मग पुढे बाईंनी आईला सांगितलंच.. पण माझी काजळ पावडरची चिंता बघून आई हसायला लागली..😬 आणि त्यानंतर कधीही मी रडत असले तर बाबा आणि आई मला म्हणायचे की अगं रडली तर तुझी पावडर पुसून जाईल.. आणि मी लगेच रडायचं थांबवायची..🙈 
तसं ना मला माझ्या बाबाने एक फळा आणि छडी आणली होती.. रोज शाळेतून आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना मी जे शाळेत शिकले ते शिकवायची.. माझे विद्यार्थी कोण? तर घरातली प्रत्येक फरशी म्हणजे माझा विद्यार्थी.. त्यात एक चिंटू (हा माझ्या आजोळी अंबरनाथला आजीच्या घराशेजारी राहणारा माझ्याच वयाचा माझा मित्र) दुसरी बबली (हे माझ्या आईचं माहेरचं नाव) आणि तिसरी बुजी (ही पण आजीच्या बाजूला राहणारी पण माझ्यापेक्षा खूप मोठी मुलगी) हे तिघे माझे आवडते विद्यार्थी होते.. मी सगळे प्रश्न याच तिघांना विचारायची आणि फटके द्यायचे असतील तर दुसऱ्या फरश्यांना (म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना) द्यायची..🙊 
मी माझ्या शाळेत जरी मराठीत शिकत असले तरी माझ्या विद्यार्थ्यांना मी हिंदीत शिकवायची.. कारण माझ्या भावाच्या जन्माच्या वेळी जेव्हा मी अंबरनाथला गेले होते तेव्हा पहिल्या दिवशी मला ती हिंदी भाषा समजतच नव्हती.. पण दोन दिवस फक्त दारात उभं राहून मी या हिंदी बोलणाऱ्या पोरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते.. आणि तिसऱ्या दिवशी मी त्यांच्यात खेळायला जाऊन त्यांच्याच हिंदी accent मध्ये बोलत होते.. माझे आजी आजोबा, आई बाबा तर थक्क झाले होते माझी दोन दिवसांत शिकलेली हिंदी बघून.. आणि म्हणूनच माझा प्रयत्न होता की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी यायलाच हवी..😊 
मग ही कुंभार गल्लीतली शाळा सोडल्यावर मला समर्थ शाळेत ऍडमिशन मिळालं नाय म्हणून गांधी मैदानातल्या मार्कंडेय शाळेत घातलं.. ती शाळा मंदिरात बांधलेली होती.. आजूबाजूला मंदिरं होती आणि खेळायला मैदान पण होतं.. मी तिथल्या बालवाडीत प्रवेश घेतला तेव्हा बघितलं की माझ्याएव्हढीच टाबरं (म्हणजे पोरं) शाळेत बोंबलत बसायची.. कोणी कोणी तर चड्डीत शी पण करून ठेवायचं..🙄 म्हणजे इतकी मोठी होऊन ही पोरं अशी कशी वागू शकतात हेच मला समजायचं नाय..😵 त्या बालवाडीच्या वर्गात एक सुविचार होता 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'.. पुढचं वाक्य काय मला समजायचं नाय पण फक्त तेल गळतंय एवढं समजायचं.. बालवाडीच्या मानाने ते पुरेसं होतं..😇
मग हे बालवाडीचं वर्ष संपलं आणि आम्ही पहिलीला आलो.. आम्ही म्हणजे मी आणि माझी गल्लीतली मैत्रीण ऐश्वर्या.. आमच्यापैकी कोण मोठं आहे हे आम्हाला माहीत नसल्याने आम्ही दोघी एकमेकींना तायडी म्हणायचो आणि अजूनही म्हणतो.. आम्ही खऱ्या अर्थाने लंगोट यार होतो आणि अजूनही आहोत.. तर आम्ही पहिलीला आलो आणि शाळा साडेसातला भरायला लागली.. माझे वांदे झाले.. कारण मी जन्मापासूनच अत्यंत झोपाळू प्राणी.. कोणी मला एकवेळ रात्रभर जागायला सांगितलं तर मी जागू शकते पण पहाटे सहा वाजता उठणं म्हणजे शरीरातून यमाने प्राण काढून घेण्यासारखं आहे..  मग मी रोज शाळेला उशिरा जायची.. एकतर सकाळी हळूच उठायचं.. मग हळूच ब्रश करायचं, मग सावकाश अंघोळ आणि मग हळूहळू चहामध्ये बिस्किटं बुडवून खायचं.. मग निवांत शाळेचं आवरून शाळेत जायचं.. आणि माझा बाबा मला चिडवायला 'आवराss थिगळेsssss' असं म्हणाला की मला जाम रडायला यायचं..😖 एकदा असाच खूप पाऊस पडला होता आणि मला उशीर पण झाला होता.. शाळेसमोर खूप पाणी आणि चिखल पण साचला होता.. मला उशीर झाला की बाबा कधीच वर्गापर्यंत यायचा नाय.. मग मलाच युद्धावर निघाल्यागत गेटपासून वर्गापर्यंत जावं लागायचं.. आणि त्या दिवशी तर वर्गाच्या दारात पण चिखल आणि पाणी साचलेलं होतं.. मी घाईघाईत आले आणि त्या पाण्यात पाय घसरून पडले..😕😓 च्यामारी आख्खा वर्ग मला हसला होता..!!😡 मला ते embarrassed की काय ते फील झालं होतं..🤕 डोळ्यातलं पाणी पण डोळ्याच्या कडांपर्यंत आलं होतं पण मला रडताना बघून अजून सगळे हसतील म्हणून मी रडणं दाबून ठेवलं होतं.. त्यात मला आधीपासूनच पहिल्या बेंचवर बसायची सवय होती आणि असला लोच्या झाल्यामुळं मला मागे बघायची पण सोय राहिली नव्हती..😏 
त्यावेळी मला वर्गशिक्षिका म्हणून श्रीगादी बाई होत्या.. पुढे चौथीपर्यंत त्याच वर्गशिक्षिका मला लाभल्या हे माझंच भाग्य.. मग दुसरीत आल्यावर माझ्या बाईंच्या लक्षात आलं की मी अभ्यास तर करते पण मी भित्री आहे आणि म्हणून सगळ्यांसमोर उत्तरं द्यायला घाबरते.. पण माझी मैत्रीण ऐश्वर्या उत्तर चुकीचं असो वा बरोबर, देऊन मोकळी व्हायची.. मी मात्र वर्गात उभं राहायला पण घाबरायची.. मग बाईंनी एक दिवस माझ्या आईला बोलावलं आणि म्हणाल्या, प्राची अभ्यास तर करते पण खूप घाबरते.. तुमच्या घरात कोणी strict व्यक्ती आहे का ज्याला ती घाबरते? तेव्हा आईने सांगितलं की तिचे बाबा खूप कडक स्वभावाचे आहेत म्हणून असं होतंय कदाचित.. पण आईने बाईंना विनंती केली की तुम्ही माझ्या मुलीचा भित्रेपणा घालवा.. मग बाईंनी मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला.. ते काय असतं मला माहित नव्हतं पण बाई म्हणाल्या की जे तुला दिलंय ते तोंडपाठ करून ये.. बाईंची आज्ञा म्हटल्यावर मी शब्दनशब्द पाठ केला.. आणि त्या शनिवारी शाळेत स्पर्धा होती.. बाई म्हणाल्या, तुझं नाव आल्यावर तू जाऊन पाठ केलेलं तिथं बोलायचं.. अबे तिथं पहिली ते चौथीतले किमान 300 ते 350 पोरं अस्तेन बावा..!!😨 पण आता मी पळून पण जाऊ शकत नव्हते..😰 दोन तीन जणांचं भाषण झाल्यावर माझं नाव घेतलं आणि मी माईकसमोर आले.. समोर एवढे पोरं, मागे सगळ्या शिक्षिका.. आणि डोळ्यासमोर अंधार..😑 शब्दच पळून गेले होते डोक्यातून आणि तोंडातून.. बाई मला खालून म्हणत होत्या 'प्राची बोल, प्राची बोल..' आणि मला पहिली ओळच आठवेना.. पण नंतर अर्ध्या मिनिटाने मला पहिली ओळ आठवली 'अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो..'😍 आली भो आपली गाडी रुळावर..! मग जे धडाधड शब्द फेकले.. पण सगळे ढगात बघूनच..😆 कारण खाली कोणाकडे बघायची आपली हिंमत नव्हती.. एकदाचं भाषण संपलं.. मी खाली उरतले आणि माझ्या बाई एवढ्या खुश झाल्या की काय सांगू.. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं..!!🤗 त्यांनी मला पोटाशी घेतलं आणि शाबासकी दिली.. कसली भारी फिलिंग होती यार ती.. !!😘
नंतर बाईंनी मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि बाईंची ती शाबासकी मिळवण्यासाठी मी पण प्रत्येक स्पर्धेत भाग घेत गेले.. मला जिंकणं महत्त्वाचं नव्हतं.. बाईंनी माझं केलेलं कौतुक मला हवंहवंसं वाटत होतं.. त्यामुळं 'टिचर के लिये कुछ भी' हे आपण ठरवून टाकलं होतं..😉
त्यानंतर..
.
.
.
.
.
.
प्राchi..💞
13/05/2020

रम्य ती शाळा.. (भाग १)

'जो सब करते हैं यारों, वो क्यूँ हम तुम करे..
युं ही नफरत करते करते, काहे को हम मरे?
घर वालों से टिचर से भला हम क्यूँ डरे??
यहां के हम सिकंदर, चाहे तो रख ले सब को अपनी जेब के अंदर..
अरे हम से बच के रहना मेरे यार..'

हे गाणं कित्ती जरी आवडीचं असलं आणि लहानपणी रोज म्हणत असले तरी आपली काय हिंमत नव्हती शिक्षकांशी आणि घरच्यांशी पंगा घ्यायची..😬
म्हणजे ना, आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यातले किमान 22 वर्ष शिक्षणात घालवले असतील.. आणि त्यातले 16 वर्ष शाळेत..😍
ही शाळा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक.. मग तो घटक तुम्हाला आवडो वा न आवडो..😆 
माझ्याही आयुष्यात शाळेच्या मस्त आठवणी आहेत.. पण हा गेल्या 25 वर्षांचा प्रवास एका लेखात लिहिणं मुळीच शक्य नाहीये.. त्यामुळं किमान 3 ते 4 भागांत मी माझ्या शाळेच्या गमतीजमती मांडणारे.. 
हा विषय गेल्या 2 वर्षांपासून डोक्यात घोळतोय पण नेमकं काय लिहावं आणि कसं लिहावं ते समजत नव्हतं.. 
मी पहिल्यांदाच एखादा इतका मोठा लेख लिहायचा प्रयत्न करतीये.. पण हा फक्त लेख नाहीये.. या आठवणी आहेत..❤️ 
आयुष्यभराची शिदोरी.. तो फिर चलो फ्लॅशबॅक में..
साल 1997 - 98..🙊 
तशी माझी सगळ्यात पहिली ऑफिशियल शाळा म्हणजे दाभोळकर बाईंची शाळा.. त्यावेळी ती शनी चौकात होती.. आणि माझं वय असेल 3 - 4 वर्षं.. ती शाळा म्हणजे फक्त जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन जायचं ठिकाण.. आणि मग दाभोळकर बाई आम्हाला मनाचे श्लोक, स्तोत्रं आणि प्रार्थना, बडबडगीतं शिकवायच्या.. माझा बाबा मला शाळेत सोडवायला यायचा आणि आई घ्यायला यायची.. पण तोपर्यंत शाळेत मजा असायची..
शाळेत मनाचे श्लोक म्हणत असताना मला काही ओळींचा अर्थ समजायचा नाय.. म्हणजे मनाचे श्लोक समजावेत इतकी मोठीही नव्हते म्हणा मी.. तरी तोडकेमोडके अर्थ लावून समजून घ्यायचा प्रयत्न करायची.. 
त्यातल्या,
'सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो।।'
या ओळी म्हणताना माझ्याकडून एक घोळ व्हायचा.. मी 'थोर' ऐवजी 'मोर' म्हणायची आणि मग विचार करत बसायची की हा मोर काहीतरी सांडून येतो आणि तो धन्य होतो.. म्हणजे नेमका कसा आणि धन्य म्हणजे काय होतो?? आणि 'जनी तोचि तो' ऐवजी 'जनी टोचितो' असं म्हणायची.. म्हणजे तो काहीतरी सांडून येतो आणि टोचा मारतो तरीही धन्य होतो??🤔
शाळेतून घरी येताना अख्ख्या रस्त्याने माझ्या डोक्यात हाच विचार असायचा पण माझा बाबा स्वभावाने खूप कडक होता आणि त्याच्यासमोर विनाकारण उभं राहायची पण मला भीती वाटायची म्हणून मी हा प्रश्न कधीच कोणालाच विचारला नाय.. मग पुढे मला तो श्लोक समजला तो भाग वेगळा..😛 
पण मग त्यानंतर कुंभारगल्लीत गोरोबा काकांच्या मंदिरात मी बालवाडी शाळेत जायला लागली.. ती शाळा पण मला खूप आवडायची.. आणि रविवारी शाळा बंद आहे हे मी सांगून पण ऐकायची नाय म्हणून आईला मला शाळेत घेऊन जावं लागायचं.. रविवारीपण मी आईकडून डोक्यावर मस्त दोन नारळाच्या शेंड्या घालून आणि माझ्या आवडीचा स्कर्ट घालून शाळेत घेऊन जायला लावायची.. आणि मग असं रविवारच्या दिवशी पण माझी आई मला शाळेत घेऊन जायची तेव्हा त्या कुंभार गल्लीतल्या बायका दात काढायच्या..🙄 मग आई मला शाळेचं कुलूप दाखवायची आणि घरी घेऊन यायची.. 
पण ना, मी शाळेत बसलेली असताना माझा आप्पा म्हणजे माझा काका शाळेच्या खिडकीतून मला 'मने, मने' असा आवाज द्यायचा तेव्हा मला जाम राग यायचा.. मी त्याला म्हणायची की असं शाळा चालू असताना तू मला तिकडं येऊन आवाज नको देत जाऊ बाबा, मला नाय आवडत.. पण तो कुठं ऐकायचा..😏
एकदा शाळेत असताना माझं दप्तर हरवलं..😑 म्हणजे मी माझ्या समोरच घेऊन बसले होते की.. पण अचानक कुठं गेलं काय माहीत.. बरं दप्तरात नवीन पाटी होती ती हरवली म्हणून वेगळी भीती आणि घरी गेल्यावर बाबासमोर कसं उभं राहू हा वेगळाच धाक..😓 बाई शिकवताना पण माझी नजर वर्गभर भिरभिरत होती की कुठंतरी माझं दप्तर मिळेल.. पण काय दिसलं नाय.. मग शेवटी आपला अश्रूंचा बांध फुटला आणि मी मोठमोठ्याने रडायला लागले..😭 आमच्या बाईंना समजेना की अचानक मला काय झालंय.. मला तर बाबा आठवूनच अजून मोठ्याने रडायला येत होतं.. पण रडता रडता बाईंना सांगितलं की माझं दप्तर हरवलंय.. मग बाईंनी पण शोधलं.. तरीही सापडेना.. मग बाईंनी सगळ्यांना उठवलं तेव्हा माझ्या पुढे जो मुलगा बसला होता तो माझ्याच दप्तरावर बसलेला होता..😵 माकड्या..😡 असा राग आला होता मला त्याचा कायच सांगू.. म्हणजे एकतर नुसता बाबाचा चेहरा समोर येत होता आणि दुसरं म्हणजे रडून रडून माझं काजळ आणि पावडर पुसली गेली होती.. शी बाई..!!😩 
पण एवढं सगळं होऊन पण मी घरी चकार शब्दपण काढला नाय..😷 
मग पुढे..
क्रमशः
.
.
.
.
.
.
.
प्राchi..💞
12/05/2020

(फोटोत तो पांढऱ्या शर्टमध्ये माझा बाबा..❣️)