Wednesday, 24 January 2018

गुंतता हृदय हे..

तसं त्याचं प्रेम नव्हतंच तिच्यावर कधी.. बाकीच्या सामान्य मुळींसारखीच होती ती दिसायला पण डोळे फारच बोलके.. अन् परिस्थितीपुढे हतबल तिचं कुटुंब.. हेच हेरून त्यानं डाव साधला होता.. दोन दिवसांच्या ओळखीत तो तिच्यावर हक्क दाखवायला लागला होता.. इतक्या हक्कानं कुणीतरी आपल्याशी बोलतंय म्हटल्यावर तीही सुखावून गेली होती.. खरं पाहता 'त म्हणता तपेलं' ओळखणाऱ्या मुलींच्या जमान्यात ती ज्ञानाने मागासच होती.. म्हणून तर त्याच्या वासनेला प्रेम समजून बसली.. परंतु 'असलं' काही करण्याची तिची बिलकुल मानसिकता नव्हती.. आणि खरं तर आजच्या फास्ट फॉरवर्ड काळात अशा साध्या मुली असतात यावर कुणाचाही विश्वास बसणं अशक्यप्राय गोष्ट.. एकाच महिन्याच्या ओळखीत त्याच्याकडून होणारी धमकिबाजी आणि मारहाण (आणि नको असलेलं प्रेमसुध्दा) यामुळं ती हादरली होती.. त्यात वडिलांनी साथ सोडल्याने आईची काम करताना होणारी धावपळ, चारही मुलींची समाजाकडून होणारी अवहेलना आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आलेलं असहायपण.. तिच्या घरचं ते विदारक चित्र पाहून मुळापासून हादरले होते मी.. कशी या मायलेकींना मदत करावी हेच सुचत नव्हतं.. त्या रात्री अगदी सुन्न डोक्याने मी घरी पोचले आणि रात्रभर तिचाच विचार करत राहिले.. 

काय चूक होती त्या बिचारीची या सगळ्या प्रकारात..?? ती अबोल होती म्हणून की तिची परिस्थिती नव्हती म्हणून..?? की तिला पाठीराखा असा तिचा भाऊ किंवा बाप नव्हता म्हणून..?? खरंच मुलीचं शरीर इतकं स्वस्त असतं का की कुणीही आपल्या आश्वासक शब्दजालामध्ये गुंतवून तिला आपला गुलाम करेल..? कुठं गेला तो नाही म्हणण्याचा अधिकार अन् कुठं गेली ती स्त्री पुरुष समानता ? खरं तर तिच्या आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांचा चुराडा केला होता त्यानं.. जीवनातले जे नाजूक गुलाबी क्षण तिनं तिच्या इच्छेने अनुभवायचे होते ते त्या वासनेने गिळंकृत करून टाकले होते.. तिच्या अश्रूंमधून आणि शब्दांमधून त्या धुंद क्षणाची किळसवाणी वर्णनं वेळोवेळी काळजाला चिरून जात होती.. आणि वास्तव तर फार भयानक असतं.. ते so called प्रेम आणि ते प्रेम मिळावं यासाठी समोरचा कसा प्रयत्न करेल हे समजणं तसं मुश्किलच आहे म्हणा.. एखादा तिच्यावर धाक दाखवेल, बळजबरी करेल, धमक्या देईल.. याचा विरोध करणं हे तसं सोप्पं असतं.. परंतु तिच्याशी गोड बोलून जवळीक साधणं, प्रेमानं स्पर्श करणं, तिला हवं नको ते देणं, आणि मग 'त्या' सुखाची मागणी करणं.. अशा वेळी ती मुलगी नाही म्हणू शकत नसते.. 

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी..
हा प्रणयगंध परीमळे तुझ्या अंगाशी..

या इथे जाहला संगम दो सरितांचा..
प्राक्तनी अपुल्या योग तिथे प्रीतीचा..
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी..

दुर्दैवे आपण दुरावलो या देही..
सहवास संपता, डागळले ऋण तेही..
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी..

तेव्हा सर्व झुगारून देऊन जर ती त्याला आपलं सर्वस्व अर्पण करते तर ती चुकीची कशी असेल.. तिच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्यात ना.. यात गरज आहे ती समाजाने आपली मानसिकता बदलण्याची आणि आपल्या बेलगाम शुर वीरांना योग्य मार्गदर्शन करण्याची.. यासाठी किती जण माझ्या या विचारांत सहमत असतील ते माहीत नाही.. लेकीन उम्मीद पे दुनिया कायम हैं..
आणि कहाणीची माझी मुख्य पात्र अजूनही संभ्रमात आहे.. मी तर आहेच तिच्यासोबत.. बाकी बघुयात कोण कोण येतंय आमच्या सोबतीला.. 

प्राchi
२२/१/२०१८ 

3 comments: