Wednesday, 13 May 2020

रम्य ती शाळा.. (भाग १)

'जो सब करते हैं यारों, वो क्यूँ हम तुम करे..
युं ही नफरत करते करते, काहे को हम मरे?
घर वालों से टिचर से भला हम क्यूँ डरे??
यहां के हम सिकंदर, चाहे तो रख ले सब को अपनी जेब के अंदर..
अरे हम से बच के रहना मेरे यार..'

हे गाणं कित्ती जरी आवडीचं असलं आणि लहानपणी रोज म्हणत असले तरी आपली काय हिंमत नव्हती शिक्षकांशी आणि घरच्यांशी पंगा घ्यायची..😬
म्हणजे ना, आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यातले किमान 22 वर्ष शिक्षणात घालवले असतील.. आणि त्यातले 16 वर्ष शाळेत..😍
ही शाळा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक.. मग तो घटक तुम्हाला आवडो वा न आवडो..😆 
माझ्याही आयुष्यात शाळेच्या मस्त आठवणी आहेत.. पण हा गेल्या 25 वर्षांचा प्रवास एका लेखात लिहिणं मुळीच शक्य नाहीये.. त्यामुळं किमान 3 ते 4 भागांत मी माझ्या शाळेच्या गमतीजमती मांडणारे.. 
हा विषय गेल्या 2 वर्षांपासून डोक्यात घोळतोय पण नेमकं काय लिहावं आणि कसं लिहावं ते समजत नव्हतं.. 
मी पहिल्यांदाच एखादा इतका मोठा लेख लिहायचा प्रयत्न करतीये.. पण हा फक्त लेख नाहीये.. या आठवणी आहेत..❤️ 
आयुष्यभराची शिदोरी.. तो फिर चलो फ्लॅशबॅक में..
साल 1997 - 98..🙊 
तशी माझी सगळ्यात पहिली ऑफिशियल शाळा म्हणजे दाभोळकर बाईंची शाळा.. त्यावेळी ती शनी चौकात होती.. आणि माझं वय असेल 3 - 4 वर्षं.. ती शाळा म्हणजे फक्त जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन जायचं ठिकाण.. आणि मग दाभोळकर बाई आम्हाला मनाचे श्लोक, स्तोत्रं आणि प्रार्थना, बडबडगीतं शिकवायच्या.. माझा बाबा मला शाळेत सोडवायला यायचा आणि आई घ्यायला यायची.. पण तोपर्यंत शाळेत मजा असायची..
शाळेत मनाचे श्लोक म्हणत असताना मला काही ओळींचा अर्थ समजायचा नाय.. म्हणजे मनाचे श्लोक समजावेत इतकी मोठीही नव्हते म्हणा मी.. तरी तोडकेमोडके अर्थ लावून समजून घ्यायचा प्रयत्न करायची.. 
त्यातल्या,
'सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो।।'
या ओळी म्हणताना माझ्याकडून एक घोळ व्हायचा.. मी 'थोर' ऐवजी 'मोर' म्हणायची आणि मग विचार करत बसायची की हा मोर काहीतरी सांडून येतो आणि तो धन्य होतो.. म्हणजे नेमका कसा आणि धन्य म्हणजे काय होतो?? आणि 'जनी तोचि तो' ऐवजी 'जनी टोचितो' असं म्हणायची.. म्हणजे तो काहीतरी सांडून येतो आणि टोचा मारतो तरीही धन्य होतो??🤔
शाळेतून घरी येताना अख्ख्या रस्त्याने माझ्या डोक्यात हाच विचार असायचा पण माझा बाबा स्वभावाने खूप कडक होता आणि त्याच्यासमोर विनाकारण उभं राहायची पण मला भीती वाटायची म्हणून मी हा प्रश्न कधीच कोणालाच विचारला नाय.. मग पुढे मला तो श्लोक समजला तो भाग वेगळा..😛 
पण मग त्यानंतर कुंभारगल्लीत गोरोबा काकांच्या मंदिरात मी बालवाडी शाळेत जायला लागली.. ती शाळा पण मला खूप आवडायची.. आणि रविवारी शाळा बंद आहे हे मी सांगून पण ऐकायची नाय म्हणून आईला मला शाळेत घेऊन जावं लागायचं.. रविवारीपण मी आईकडून डोक्यावर मस्त दोन नारळाच्या शेंड्या घालून आणि माझ्या आवडीचा स्कर्ट घालून शाळेत घेऊन जायला लावायची.. आणि मग असं रविवारच्या दिवशी पण माझी आई मला शाळेत घेऊन जायची तेव्हा त्या कुंभार गल्लीतल्या बायका दात काढायच्या..🙄 मग आई मला शाळेचं कुलूप दाखवायची आणि घरी घेऊन यायची.. 
पण ना, मी शाळेत बसलेली असताना माझा आप्पा म्हणजे माझा काका शाळेच्या खिडकीतून मला 'मने, मने' असा आवाज द्यायचा तेव्हा मला जाम राग यायचा.. मी त्याला म्हणायची की असं शाळा चालू असताना तू मला तिकडं येऊन आवाज नको देत जाऊ बाबा, मला नाय आवडत.. पण तो कुठं ऐकायचा..😏
एकदा शाळेत असताना माझं दप्तर हरवलं..😑 म्हणजे मी माझ्या समोरच घेऊन बसले होते की.. पण अचानक कुठं गेलं काय माहीत.. बरं दप्तरात नवीन पाटी होती ती हरवली म्हणून वेगळी भीती आणि घरी गेल्यावर बाबासमोर कसं उभं राहू हा वेगळाच धाक..😓 बाई शिकवताना पण माझी नजर वर्गभर भिरभिरत होती की कुठंतरी माझं दप्तर मिळेल.. पण काय दिसलं नाय.. मग शेवटी आपला अश्रूंचा बांध फुटला आणि मी मोठमोठ्याने रडायला लागले..😭 आमच्या बाईंना समजेना की अचानक मला काय झालंय.. मला तर बाबा आठवूनच अजून मोठ्याने रडायला येत होतं.. पण रडता रडता बाईंना सांगितलं की माझं दप्तर हरवलंय.. मग बाईंनी पण शोधलं.. तरीही सापडेना.. मग बाईंनी सगळ्यांना उठवलं तेव्हा माझ्या पुढे जो मुलगा बसला होता तो माझ्याच दप्तरावर बसलेला होता..😵 माकड्या..😡 असा राग आला होता मला त्याचा कायच सांगू.. म्हणजे एकतर नुसता बाबाचा चेहरा समोर येत होता आणि दुसरं म्हणजे रडून रडून माझं काजळ आणि पावडर पुसली गेली होती.. शी बाई..!!😩 
पण एवढं सगळं होऊन पण मी घरी चकार शब्दपण काढला नाय..😷 
मग पुढे..
क्रमशः
.
.
.
.
.
.
.
प्राchi..💞
12/05/2020

(फोटोत तो पांढऱ्या शर्टमध्ये माझा बाबा..❣️)

No comments:

Post a Comment